मानाच्या दहीहंडीवर जाखमाता गोविंदांची दमदार मोहोर; वलवण पथकानेही सात थरांची सलामी देत पटकावला मान.
लोणावळा : ढोल-ताशांचा कडकडाट, गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमलेले शहर आणि दहीहंडी फोडण्यासाठी सुरू असलेली चुरस… अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लोणावळ्यात यंदाचा दहीहंडी उत्सव रंगला. शहरातील मानाच्या दहीहंड्यांमध्ये गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. यामध्ये तुंगार्ली गावातील जाखमाता गोविंदा पथकाने तब्बल आठ मानवी थर रचत मानाची दहीहंडी फोडून लक्षवेधी कामगिरी केली.
मावळ वार्ता फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी दहीहंडी सोहळ्यात जाखमाता पथकाने केलेल्या या कामगिरीमुळे तुंगार्लीसह संपूर्ण लोणावळ्यात जल्लोष झाला. विशेष म्हणजे, या दहीहंडीच्या २५ वर्षांच्या परंपरेशी जाखमाता पथकाचे खास नाते आहे. दहीहंडीची सुरुवात झालेल्या पहिल्या वर्षीही याच पथकाने हंडी फोडण्याचा मान मिळविला होता. रौप्य महोत्सवी वर्षात पुन्हा त्याच पथकाने मानाची हंडी फोडल्याने या विजयाचे विशेष कौतुक होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या दहीहंडी सोहळ्यासाठी दुपारपासूनच नागरिकांची गर्दी जमली होती. मुंबई परिसरातील तसेच लोणावळा शहर व परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावत हंडीला सलामी दिली.
अंतिम फेरीत सात थरांची रचना करण्यासाठी अनेक पथकांनी प्रयत्न केले. मात्र तुंगार्लीच्या जाखमाता गोविंदा पथकाने नियोजन, सराव आणि सांघिक ताकदीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात आठ थरांचा मानवी मनोरा उभारला आणि हंडी फोडण्यात यश मिळविले. जाखमाता पथकाच्या या कामगिरीनंतर चौकात उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
गेल्या २५ वर्षांत लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील विविध मानाच्या दहीहंड्यांमध्ये जाखमाता गोविंदा पथकाने आपली छाप कायम ठेवली आहे. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातही पथकाने आपली परंपरा कायम ठेवत आठ थरांची कामगिरी केली. दहीहंडीच्या तयारीसाठी पथकातील तरुण गेल्या काही महिन्यांपासून सराव करत होते. शिस्त, योग्य नियोजन आणि प्रत्येक गोविंदामधील समन्वय यामुळे आठ थर उभारणे शक्य झाले. जाखमाता पथकाला प्रथम क्रमांकासाठी ७५ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.
दरम्यान, जयचंद चौकात संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडीमध्ये वलवण गोविंदा पथकाने सात थर रचत हंडी फोडली आणि विजेतेपद पटकावले. सुमारे ३२ फूट उंचीवर असलेल्या या हंडीच्या अंतिम फेरीत सात पथकांमध्ये चुरस रंगली होती. प्रारंभी काही पथकांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर वलवण गोविंदा पथकाने शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सात थर उभारले आणि हंडी फोडत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या कामगिरीबद्दल वलवण पथकाला आयोजकांकडून ७७ हजार ७७७ रुपये रोख आणि मानाची ढाल देण्यात आली. उपस्थित मान्यवरांकडूनही पथकाला रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.
यंदा शिक्षक दिनाच्या दिवशीच दहीहंडी उत्सव आल्याने विविध ठिकाणी शिक्षकांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण, गोविंदा पथकांची सलामी आणि हंडी फोडण्यासाठीची चुरस यामुळे शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोणावळ्यातील विविध दहीहंडी सोहळ्यांना भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. लोणावळा शहर पोलिसांकडून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तुंगार्लीच्या जाखमाता गोविंदा पथकाने आठ थर रचत केलेली ऐतिहासिक कामगिरी आणि वलवण गोविंदा पथकाने सात थरांमध्ये मिळविलेले विजेतेपद यामुळे यंदाची लोणावळ्यातील दहीहंडी विशेष ठरली.

















