जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; कोयत्याने वार केल्यानंतर डोक्यात दगड घातला..

तळेगाव : जुन्या भांडणाचा राग मनात धरून आठ जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून तसेच डोक्यात मोठा दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे येथील शिक्षक कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रशांत शिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील सुभाष विष्णू शिंगाडे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास वराळे येथील शिक्षक कॉलनीतील एस. डी. फोटो स्टुडिओ परिसरात ही घटना घडली. प्रशांत शिंगाडे हे मित्रासोबत चहा पिण्यासाठी तेथे थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी प्रशांत यांच्याशी वाद घातला.

वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत प्रशांत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, हातावर, छातीवर आणि पाठीवर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रशांत शिंगाडे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी साहिल पांडुरंग समुखराव, सुनील पांडुरंग समुखराव, यश दीपक लोखंडे, रोहन हनुमंत सावंत, हेमराज गौतम सोनवणे आणि रोशन साव यांना अटक केली आहे. तसेच दोन विधिसंघर्षित बालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध वृत्तानुसार सर्व आरोपी समता कॉलनी, वराळे परिसरातील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण तसेच आरोपींच्या भूमिकेबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views: 509

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick