ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक सनी घोणे , नगरसेवक जाकीर खलिफा,आणि नगरसेवक निखिल कविश्वर यांनी भेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मिरवणुकीतील सहभागी बांधवांशी संवाद साधला.
लोणावळा : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह बुधवारी लोणावळ्यात पाहायला मिळाला. मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातून शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य जुलूस काढण्यात आला. या मिरवणुकीत लहान मुले, मुली, तरुण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
मीनारा मज्जिदचे चेअरमन रफिक शेख, व्हॉइस चेअरमन अन्वर निंबर्गी, सेक्रेटरी हाफिज शेख, ट्रस्टी हाजी नूरअहमद काठेवाडी व ट्रस्टी सलीम मनियार, तसेच ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली जुलूसचे आयोजन करण्यात आले होते.
मीनारा मशीद येथून जुलूसला सुरुवात झाली. आकर्षक रोषणाई आणि सजावट केलेल्या वाहनांसह ट्रॉल्यांवर विविध प्रकारची सजावट करण्यात आली होती. धार्मिक घोषणांसह फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली.
जुलूस शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि चौकांमधून मार्गक्रमण करत असताना विविध ठिकाणी नागरिकांकडून सहभागी बांधवांसाठी शरबत, पाणी, समोसे, वडापाव तसेच इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून थर्मॉसच्या बाटल्यांचेही वाटप करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजातील विविध संस्था, मंडळे आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेकांनी आपल्या वाहनांची आकर्षक सजावट केली होती. लहान मुले आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जुलूसला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या जुलूसच्या आयोजनात झीशानभाई हनिफ शेख आणि फरहानभाई हनिफ शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. मुस्लिम समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे कुटुंब सातत्याने योगदान देत असल्याचे यावेळी दिसून आले. जुलूसच्या नियोजनापासून ते सहभागी बांधवांच्या सोयी-सुविधांपर्यंत त्यांनी विशेष योगदान दिले.
शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि जुलूस शांततेत पार पडावा, यासाठी आयोजक व स्वयंसेवकांकडून विशेष काळजी घेण्यात आली. ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन करत शिस्त राखण्याचे काम केले.
मीनारा मशीद येथून सुरू झालेला हा जुलूस शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मार्गक्रमण करत सुन्नी मुस्लिम कब्रस्तान कासमशा वली बाबा दर्गा येथे पोहोचला. तेथे धार्मिक कार्यक्रम व प्रार्थनेनंतर जुलूसची सांगता करण्यात आली.
कासमशा वली बाबा दर्गा येथे जुलूसच्या सांगतेनंतर हजारो मुस्लिम बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. N.M.M.M. ग्रुप, जी वॉर्ड टेबल लँड यांच्या वतीने ही भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी भोजनाचा स्वाद घेतला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने लोणावळ्यातील मुस्लिम समाजाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि शांततेचा संदेश देत उत्सव साजरा केला.


















