लोणावळ्यात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला दोन तासांत बेड्या..

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; न्यायालयाकडून संशयित आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी..

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक १९५/२०२६ दाखल केला असून, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडित बालिकेच्या नात्यातील असल्याचे समोर आले आहे. आरोपीची चौकशी करून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली.

बालकांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज..

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांशी नियमितपणे संवाद साधणे, त्यांच्या वागणुकीतील बदलांकडे लक्ष देणे आणि कोणत्याही व्यक्तीकडून होणाऱ्या अयोग्य वर्तनाबाबत मुलांना योग्य पद्धतीने जागरूक करणे गरजेचे आहे.

मुलांनी कोणतीही संशयास्पद किंवा अस्वस्थ करणारी बाब सांगितल्यास ती गांभीर्याने घेऊन तातडीने योग्य ती मदत घेणे आवश्यक आहे. बालकांच्या सुरक्षेसाठी कुटुंबासह समाजानेही अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत असून, तपासातून समोर येणाऱ्या माहितीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Views: 474

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick