पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कार्यालयासमोर लोणावळा नगरपरिषदेचे धरणे आंदोलन..

‘दोन दिवसांत लेखी आश्वासन द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार’; नगरसेवकांचा इशारा..

लोणावळा : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीत नुकसान झालेल्या लोणावळ्यातील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी लोणावळा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक आणि नागरिकांनी गुरुवारी टाटा कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कुमार चौकापासून तुंगार्ली येथील टाटा कंपनीच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी टाटा कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पूरग्रस्त नागरिकही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

टाटा कंपनीने पूरग्रस्तांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. लोणावळा शहरातील विविध भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, फर्निचर, बेड, सोफा तसेच घरातील इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नगरसेवकांनी सांगितले. नुकसान होऊन दीड महिना उलटूनही टाटा कंपनीकडून ठोस मदत जाहीर झालेली नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी यापूर्वी टाटा कंपनीकडे पूरग्रस्तांसाठी मदतीची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी टाटा कंपनीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपनगराध्यक्ष देविदास कडू, सभागृह नेते धनंजय काळोखे, विरोधी पक्षनेत्या उषा चौधरी यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले. यापूर्वीही टाटा कंपनीकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. कंपनीकडून आठ ते पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक धनंजय काळोखे यांनी टाटा कंपनीचे वलवण आणि टाटा धरण लोणावळा परिसरात असल्याचा उल्लेख करत, पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांना मदत करणे ही कंपनीची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. “नगरसेवकांसाठी नव्हे, तर गोरगरीब पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत मागत आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

नगरसेवकांनी सांगितले की, शहरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे व घरगुती साहित्याच्या स्वरूपात मदत केली. मात्र, अनेक कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने केवळ किरकोळ स्वरूपाची मदत पुरेशी ठरणार नाही. टाटा कंपनी, शासन आणि नगरपरिषद यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी टाटा कंपनीच्या भूमिकेचा निषेध करत कंपनीने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. दोन दिवसांच्या आत लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. यापुढे टाटा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनादरम्यान टाटा कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यानंतर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणीही नगरसेवकांनी केली.

आंदोलनात सहभागी नगरसेवक..

या आंदोलनात नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, धनंजय काळोखे, मंगेश मावकर, जीवन गायकवाड, दीपा अगरवाल, स्वप्ना कदम, सनी घोणे, निखिल कवीश्वर, मोबीन इनामदार, मुकेश परमार, लक्ष्मी पाळेकर, उषा चौधरी, वसुंधरा दुर्गे, गायत्री रिले, श्वेता गायकवाड, जाकीर खलिफा, नयना पैलकर, भाग्यश्री जगताप, अनिता आंबुरे, सना चौधरी, सोनाली मराठे, सुभाष डेनकर, सुमीत गवळी, अनिल गवळी, वैशाली मोगरे, रेश्मा पाठारे आणि आरती तिकोणे आदी नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाले होते.

“पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. टाटा कंपनीने नागरिकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा,” असा इशारा आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी दिला.

Views: 147

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick