तळेगाव दाभाडे : मावळचे विद्यमान आमदार सुनीलजी शेळके यांच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात २५ सप्टेंबर २०२६ रोजी मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव दाभाडे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांबाबत करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे तसेच माजी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप मंडलाध्यक्षांच्या हस्ते हे निवेदन सादर करण्यात आले. संबंधित वक्तव्याची दखल घेऊन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
मावळ तालुक्यात १९५२ पासून जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. मावळच्या राजकारणात राजकीय मतभेद असले तरी परस्पर सन्मान आणि खेळीमेळीचे वातावरण जपण्याची परंपरा राहिली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, मतभेद हे मुद्द्यांवर असावेत, कार्यकर्त्यांच्या अवमानावर नाही. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाणे ही लोकशाहीची गरज आहे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
यावेळी मावळ तालुका भाजपा समन्वयक शांताराम बापू कदम, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडी सचिव प्रशांत भागवत, तळेगाव मंडळ अध्यक्ष विनायक भेगडे, लोणावळा मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड, पवन मावळ मंडळ अध्यक्ष दत्ता माळी, आंदर मावळ मंडळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्यासह सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

















