लोणावळ्यातील विद्यार्थ्यांनी पटकावले प्रथम क्रमांकासह विविध पुरस्कार; गुरू ज्योती भोळे यांचाही विशेष सन्मान..

लोणावळा : वृंदावन येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘श्री नृत्यांजली ब्रजरास श्रीकृष्ण कला सांस्कृतिक महोत्सवा’च्या सहाव्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लोणावळ्यातील ‘नादब्रह्म नृत्यालया’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध वयोगटांत आणि नृत्यप्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकासह अनेक पारितोषिके पटकावली. तसेच विशेष नृत्य सादरीकरणासाठी ‘सन्माननीय अतिथी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या यशामुळे नादब्रह्म नृत्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून लोणावळ्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे.
नृत्यालयाच्या संस्थापिका व मार्गदर्शिका गुरू ज्योती उज्ज्वल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सांस्कृतिक समूह नृत्यांमधील विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना परीक्षकांकडून गौरविण्यात आले.
स्पर्धेत ज्युनियर गटातील शास्त्रीय समूह नृत्याने प्रथम क्रमांक मिळवला. सब-ज्युनियर गटातील उपशास्त्रीय एकल नृत्य प्रकारात लेशा चव्हाण, पर्णिका सिंघासने आणि ध्रुवी टेलर (कल्याणजी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ज्युनियर गटातील उपशास्त्रीय एकल नृत्य प्रकारात जान्हवी गवाडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तर शास्त्रीय युगल नृत्य प्रकारात सौम्या असावले आणि समीक्षा सालियन यांनी प्रथम क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
सिनियर गटातील उपशास्त्रीय एकल नृत्य प्रकारात तनिषा शिंदे हिने प्रथम, तर सुनिक्षा शेट्टी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. सिनियर गटातील सांस्कृतिक महोत्सव समूह नृत्य प्रकारात वैष्णवी गुप्ता, दीक्षिता गुप्ता, तन्वी शिंदे, सहारा वाघमारे आणि पूर्वा शिंदे यांच्या समूहाला उत्कृष्ट सन्मान प्रदान करण्यात आला.
याशिवाय सिनियर गटातील उपशास्त्रीय विशेष सादरीकरणात गुरू ज्योती भोळे, हेमांगी भोळे, तन्वी शिंदे, वैष्णवी गुप्ता, सहारा वाघमारे आणि पूर्वा शिंदे यांनी प्रभावी नृत्याविष्कार सादर केला. भावपूर्ण अभिव्यक्ती, तालबद्धता, उत्कृष्ट अंगविक्षेप आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या विशेष सादरीकरणासाठी समूहाला ‘सन्माननीय अतिथी पुरस्कार’ (Honorable Guest Award) देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळालेल्या या यशामुळे नादब्रह्म नृत्यालयातील विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि गुरू ज्योती भोळे यांच्या मार्गदर्शनाचे फलित अधोरेखित झाले आहे. या यशाबद्दल सर्व विजेते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि गुरू ज्योती भोळे यांचे अभिनंदन होत असून नृत्यक्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

















