विसापूर किल्ल्यावर वाट चुकलेल्या चार तरुणांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

लोणावळा : विसापूर किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या चार तरुणांची वाट चुकल्याने ते जंगलात अडकले होते. माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू ऑपरेशन टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवत चौघांनाही सुखरूप बाहेर काढले.
शिवदुर्ग रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य प्रशांत शिवेकर, परशुराम विखार, राहुल वाघमारे, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर आणि सागर कुंभार यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. लोकेशनच्या आधारे त्यांनी वाट चुकलेल्या ग्रुपचा शोध घेतला.

ग्रुपमधील एका तरुणाचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे गेल्या सुमारे दोन तासांपासून ते जंगलात मोबाईल शोधत होते. मोबाईल शोधण्यात बराच वेळ गेल्याने अंधार पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. त्यातच मोबाईलची चार्जिंगही कमी झाली होती.

अशा परिस्थितीत शिवदुर्ग रेस्क्यू टीमने लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध घेतला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना पाटण गावात सुरक्षितपणे आणून सोडण्यात आले.

रेस्क्यू करण्यात आलेले चारही तरुण प्रताप जाधव (वय २०), प्रतिक नागरगोजे (वय २०), रचित हनुमंते (वय २०) आणि देवांग विश्वासराव (वय २०) असून ते पुण्यातील सिंहगड कॉलेज, वडगाव बुद्रुक येथील विद्यार्थी आहेत.

वेळीच माहिती मिळाल्याने आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तत्परता दाखवल्याने चारही तरुणांना कोणतीही दुखापत न होता सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Views: 116

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick