वाकसई येथे भरधाव कार ओढ्यात कोसळली; दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी..

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या ओढ्यात कोसळली. या अपघातात कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

वाकसई येथील सुरज ढाब्यासमोर पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. कार्ला फाट्याच्या दिशेने लोणावळ्याकडे जाणाऱ्या कारचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार थेट रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात जाऊन कोसळली. ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने अपघाताची तीव्रता वाढली.

या अपघातात हुसेन शब्बीर गोधरावाला (वय २७, रा. कोंढवा, पुणे) आणि आसीर असगरअली इनामदार (वय २६, रा. नेहरूनगर, पुणे) यांचा मृत्यू झाला. तर कारचालक अनिकेत गौतम बरवा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार ओढ्यात कोसळल्याने मदतकार्य करताना मोठी कसरत करावी लागली. जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Views: 353

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick