लोणावळा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत १ आणि २ ऑक्टोबर २०२६ रोजी मावळ तालुक्यातील वरसोली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २ हजार ९०६ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला.
वरसोली येथील एका आस्थापनेवर करण्यात आलेल्या तपासणीत १०८ किलो मिश्र चिक्की आणि २ हजार ७९८ किलो सैल भाजलेले शेंगदाणे असा एकूण २ हजार ९०६ किलो अन्नसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अन्नसाठ्याची किंमत ४ लाख ९५ हजार २०० रुपये असल्याची माहिती आहे.
तपासणीदरम्यान संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. तसेच अन्नसाठ्याच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक, लेबलिंग तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन याबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
वरसोली येथील कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या अन्नसाठ्याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासणी अहवालाच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे.
अष्ट दिशा 24/7news.

















