लोणावळ्यात ४७ वर्षांची परंपरा कायम; डीजेमुक्त नवरात्रोत्सवात पारंपरिक गरब्याचा रंग!

४७ वर्षांची परंपरा कायम; श्री शितलादेवी मंदिर मंडळाचा डीजेमुक्त नवरात्रोत्सव पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगतोय रास-गरबा..

लोणावळा : आधुनिकतेच्या काळातही पारंपरिक नवरात्रोत्सवाची संस्कृती जपण्याचे काम लोणावळ्यातील श्री शितलादेवी मंदिर नवरात्र मंडळाकडून केले जात आहे. सन १९७९ मध्ये सुरू झालेल्या या मंडळाच्या नवरात्रोत्सवाला यंदा ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. डीजेचा वापर टाळून पारंपरिक भक्तिगीते, शहनाई आणि ढोलाच्या तालावर साजरा होणारा रास-गरबा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

या नवरात्रोत्सवाची सुरुवात लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक कै. पुखराज साकलचंद रावल यांनी केली. त्यांच्या निधनानंतर कै. कुंदन पुखराज रावल यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. सध्या रावल कुटुंबाची तिसरी पिढी या उत्सवाची जबाबदारी सांभाळत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी मंडळाचे मानद अध्यक्ष राकेश कुंदन रावल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष परेश जैन, उपाध्यक्ष महेश मोगरे आणि संपूर्ण कार्यकारिणी प्रयत्नशील आहे.

आज अनेक सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात असताना श्री शितलादेवी मंदिर नवरात्र मंडळाने मात्र डीजेला फाटा दिला आहे. मंडळाचे सभासद, पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते स्वतः पारंपरिक भक्तिगीते व गरब्याची गाणी सादर करतात. गरब्याला पारंपरिक रंग देण्यासाठी गुजरातमधून विशेष शहनाई आणि ढोल मागवले जातात. या वाद्यांच्या तालावर महिला, पुरुष आणि लहान मुले उत्साहाने गरब्यात सहभागी होतात.

मंडळातर्फे दरवर्षी रास-गरबा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये लोणावळ्यासह परिसरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात. भक्तिगीते, पारंपरिक वाद्ये आणि सामूहिक गरबा यांमुळे या उत्सवाला वेगळी ओळख मिळाली आहे.

गेल्या ४७ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे. आधुनिकतेच्या काळातही पारंपरिक संगीत, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जपणारा श्री शितलादेवी मंदिर नवरात्र मंडळाचा हा उत्सव लोणावळ्यातील नवरात्रोत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करतो.

Views: 136

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick