लोणावळ्यात वलवण गोविंदा पथकाची बाजी; सात थर रचत फोडली मानाची दहीहंडी..

लोणावळा : संकल्प युवा प्रतिष्ठान लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात वलवण गोविंदा पथकाने सात मानवी मनोरे रचत रात्री १२.१५ वाजता मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. सुमारे ३२ फूट उंचीवर लावण्यात आलेली दहीहंडी वलवण पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सात थर रचत फोडली. या विजयाबद्दल आयोजकांकडून पथकाला सहा फूट उंचीची मानाची ढाल आणि ७७ हजार ७७७ रुपये रोख बक्षीस देण्यात आले. याशिवाय उपस्थित मान्यवरांकडूनही पथकावर मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

दहीहंडी फोडण्याच्या अंतिम फेरीत सात गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. लोणावळा शहरातील मानाच्या इतर दोन दहीहंड्या फुटल्यानंतर सर्व गोविंदा पथके, मान्यवर आणि दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची पावले याजयचंद चौकाकडे वळली. परिसरात मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा उत्साह आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मानाची दहीहंडी नेमके कोणते पथक फोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

सर्वप्रथम श्रीमंतयोगी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर खंडाळा गोविंदा पथकाने प्रयत्न केला, परंतु त्यांचाही प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेर वलवण गोविंदा पथकाने मैदानात उतरत अचूक नियोजन आणि सांघिक ताकदीच्या जोरावर मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली. सात थरांचा मनोरा उभा करत वलवण पथकाने दहीहंडीपर्यंत मजल मारली आणि रात्री १२.१५ वाजता हंडी फोडत संकल्प युवा प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली.

विशेष म्हणजे, सलग तीन वर्षे ही मानाची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी आयोजकांनी यापूर्वीच ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांच्या विशेष बक्षिसाची घोषणा केली आहे. यंदाच्या विजयामुळे वलवण गोविंदा पथकाने या आव्हानाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षेही मानाची दहीहंडी वलवण पथक आपल्या नावावर कायम ठेवणार की अन्य गोविंदा पथके त्यांना आव्हान देत बाजी मारणार, याकडे आता दहीहंडीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Views: 280

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick