लोणावळ्यात रायवूड गार्डन येथे मावळ तालुका असंघटित कामगार संघाचा भव्य नवरात्रोत्सव; सामाजिक कार्याचा १६ वर्षांचा प्रवास..

 

अमित प्रकाश गवळी यांच्या संकल्पनेतून २०१० मध्ये उत्सवाची सुरुवात; धार्मिक उपक्रमांसह आरोग्य, रक्तदान आणि गरजू कामगारांसाठी विविध सामाजिक उपक्रम..

लोणावळा : मावळ तालुका असंघटित कामगार संघाच्या वतीने लोणावळ्यातील रायवूड गार्डन येथे दरवर्षी भव्य नवरात्रोत्सव साजरा केला जातो. लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी यांच्या संकल्पनेतून २०१० मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाला यंदा १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची जोड देत या नवरात्रोत्सवाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मावळ तालुक्यातील माळीकाम, विगारीकाम तसेच धुणीभांडी आणि घरकाम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मावळ तालुका असंघटित कामगार संघाची स्थापना २०१० मध्ये अमित प्रकाश गवळी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. असंघटित कामगारांसह गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करणारे हक्काचे व्यासपीठ म्हणून या संघटनेने काम केले आहे. गेल्या १६ वर्षांत विविध प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे संघटनेशी मोठ्या संख्येने कामगार जोडले गेले आहेत.

रायवूड गार्डन येथील निसर्गरम्य परिसरात साजरा होणाऱ्या या नवरात्रोत्सवात दरवर्षी आकर्षक सजावट आणि भव्य मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. साई मंदिर, गणेश महाल आणि आदियोगी शिवमंदिर यांसारख्या मंदिरांच्या प्रतिकृतींसह आकर्षक विद्युत रोषणाई हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. श्री महालक्ष्मीच्या आगमनाचा आणि विसर्जनाचा सोहळाही पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मूर्तीची ढोल-लेझीमच्या गजरात भव्य मिरवणूक काढून थाटात विसर्जन केले जाते.

या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून १,५०० व्यक्तींना आरोग्यविषयक लाभ, ५०० ज्येष्ठ नागरिकांना दाखले आणि १०० व्यक्तींना दिव्यांगत्वाचे दाखले मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

कोरोना महामारीच्या काळात मावळ तालुका असंघटित कामगार संघ, स्थानिक गणेशोत्सव मंडळे तसेच लोणावळ्यातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी अन्नदान करण्यात आले. त्याच काळात डॉ. अमोल कालेकर, मावळ तालुका असंघटित कामगार संघ आणि पुरंदर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ७६२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

उत्सवात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांबरोबरच अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्रविकार आणि मणक्याच्या विकारांबाबत तपासणी व मार्गदर्शन केले जाते. नागरिकांच्या कानांची मशीनद्वारे मोफत तपासणी करून गरजूंना श्रवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले आहे. तसेच १४ ते २१ वयोगटातील १,२०० अविवाहित मुलींसाठी लसीकरण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही या उत्सवात स्थान देण्यात आले आहे. भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा, मल्लखांब सादरीकरण आणि विविध साहसी खेळांचे आयोजन केले जाते. मावळ तालुक्यापुरत्या भजन स्पर्धा, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा तसेच रास-दांडिया आणि गरबा नृत्याचे कार्यक्रम उत्सवाची रंगत वाढवतात. तालुक्यातील वारकरी, सांप्रदायिक मंडळी आणि भाविकांसाठी दरवर्षी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते.

धार्मिक परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा नवरात्रोत्सव लोणावळ्यासह संपूर्ण मावळ तालुक्यातील भाविकांचे आकर्षण ठरतो. अमित प्रकाश गवळी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून असंघटित कामगारांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याबरोबरच आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांना चालना मिळाली आहे. त्यामुळे रायवूड गार्डन येथील नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सहभाग आणि लोकसहभागातून साजरा होणारा उत्सव म्हणून ओळखला जात आहे.

Views: 90

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick