लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बंगला परिसरात बंद बंगल्याला चोरट्याने लक्ष्य करून सोन्याचे व रत्नजडित दागिने तसेच मनगटी घड्याळ असा एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ३० ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चोरीच्या घटनांबाबत चिंता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक बंगला बंद करून कोल्हापूर येथे गेले होते. ही संधी साधून चोरट्याने बंगल्याभोवतीची उंच कंपाऊंड वॉल ओलांडून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर गॅलरीतून घरात प्रवेश मिळवत दरवाजा तोडला आणि घरातील सोन्याचे व रत्नजडित दागिने तसेच मनगटी घड्याळ असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे. चोरट्याने बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी आणि चोरीनंतर केलेल्या हालचालींची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासली जात आहे.
लोणावळा शहरात मागील काही काळात चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून नियंत्रण आणण्यात आले होते. मात्र, बारा बंगला परिसरात बंद बंगल्याला लक्ष्य करून झालेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

















