लोणावळा : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, लोणावळा प्रखंड यांच्या वतीने गुरुवारी (दि. 14) शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही रॅली स्वतंत्रवीर सावरकर पुतळा चौक, भांगरवाडी येथे पोहोचली. रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांमुळे रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे तिरंगा रॅलीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
भांगरवाडी येथील स्वतंत्रवीर सावरकर पुतळा चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
‘हर घर तिरंगा’ अभियानाची पार्श्वभूमी
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तिरंग्याशी जोडण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. या अभियानाची सुरुवात 2022 मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत करण्यात आली होती. त्यानंतर तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा आणि अन्य उपक्रमांमधून नागरिकांचा सहभाग वाढविण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशभरात विविध स्तरांवर तिरंगा रॅली आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यात झालेल्या तिरंगा रॅलीतून राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर आणि देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात निघालेल्या या रॅलीमुळे लोणावळ्याचे वातावरणही देशभक्तीमय झाले होते.

















