काही दिवसांत घरफोडी, रोकड, तांब्याच्या वस्तूंसह पर्यटकांच्या सामानावर डल्ले; काही गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा, मात्र वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता.
लोणावळा : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. बंद बंगले, बांधकामाच्या ठिकाणी तसेच पर्यटनस्थळांवर चोरट्यांकडून चोरी केली जात असल्याने नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी काही गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना अटक केली असली, तरी वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सप्टेंबरमध्ये तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली परिसरातील बंद बंगल्यात घरफोडी करून सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. या घटनेमुळे बंद बंगल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला.
सप्टेंबरमध्ये उघडकीस आलेल्या वलवण बाराबंगला परिसरातील बंद बंगल्यातील घरफोडीत तब्बल १४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या घटनेमुळे शहरातील उच्चभ्रू सोसायट्या आणि बंद बंगल्यांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले.
सप्टेंबरमध्येच तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली येथील बांधकामाच्या ठिकाणाहून विद्युत तारा आणि तांब्याची पाइप असा सुमारे १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी निखिल विजय पालांडे याला ८ सप्टेंबरला अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे या गुन्ह्याचा छडा लागला असला, तरी बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.
मार्चमध्ये लोणावळा शहर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली होती. या कारवाईत तब्बल सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. ऑगस्टमध्येही चोरीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला कल्याण येथून अटक करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे २ लाख २९ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ऑगस्टमध्येच राजमाची पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेची चोरी झाली होती. या प्रकरणातही लोणावळा शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
एप्रिलमध्ये नांगरगाव येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये घरफोडी करून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या घटनेने लोणावळा शहर आणि परिसरातील घरफोड्यांचे गांभीर्य अधोरेखित झाले.
पोलिसांनी अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र एका बाजूला गुन्हे उघडकीस येत असताना दुसऱ्या बाजूला नव्या चोरीच्या घटना सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणांची नियमित तपासणी करणे आणि पर्यटनस्थळांवर अधिक सतर्कता ठेवणे गरजेचे आहे.
लोणावळ्यासारख्या पर्यटननगरीत देशभरातून पर्यटक येतात. त्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची आहे. चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच ते घडण्यापूर्वीच प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “चोरट्यांना पोलिसांचा धाक आहे तरी किती?” असा सवाल आता लोणावळ्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

















