लोणावळा : मावळ तालुक्यातील दहिवली गावच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १० लाख ११ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना दहिवली परिसरात अवैधरीत्या कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३१ ऑगस्ट रोजी पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दहिवली येथे छापा टाकला.
यावेळी घटनास्थळी कल्याण मटका जुगार खेळताना तसेच खेळवताना राहुल अशोक गायकवाड, रतन महादेव दंडगुले आणि अमर उर्फ शंकर नाना पोटकर हे तिघे आढळून आले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १० लाख ११ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

















