गोरगरीब पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी आंदोलन; व्यवसाय बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन.
लोणावळा : लोणावळा-खंडाळा परिसरात टपरी, पथारी आणि हातगाडी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, या कारवाईच्या विरोधात टपरी-पथारी हातगाडी संघटनेच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी लोणावळा नगरपरिषदेवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, लोणावळा-खंडाळा परिसरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष गणेश गोपाळराव चव्हाण यांनी केले आहे.
लोणावळा-खंडाळा परिसरात टपरी, पथारी आणि हातगाडी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब व्यावसायिकांच्या व्यवसायांवर कारवाई करण्यात येत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. या व्यावसायिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने हा मोर्चा आयोजित केला आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पथविक्रेत्यांच्या हक्कांसंदर्भात २००९, २०१४, २०२४ तसेच इतर विविध शासन निर्णय (जीआर) जारी केले असून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नगरपरिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या शासन निर्णयांची लोणावळा नगरपरिषदेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप टपरी-पथारी हातगाडी संघटनेने केला आहे.
गोरगरीब पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मावळी शेतकरी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो लोणावळा नगरपरिषदेवर जाणार आहे. लोणावळा-खंडाळा परिसरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून वेळेवर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आवाहन अध्यक्ष गणेश गोपाळराव चव्हाण, कार्याध्यक्ष सुनील भाऊ कुचेकर, सचिव रमेश द. म्हाळस्कर तसेच लोणावळा-खंडाळा परिसरातील सर्व पथविक्रेता समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.

















