लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार लोणावळा नगरपरिषद हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाच्या जे.सी.आर. नपप्रसंग/२०२६/एकल महिला धोरण/का-६ ई-२४१४००७, दिनांक १० ऑगस्ट २०२६ या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने लोणावळा नगरपरिषद हद्दीतील १८ वर्षांवरील एकल महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी संबंधित महिलांकडून माहिती घेणार असून, त्यांनी सत्य व अचूक माहिती देऊन सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
तसेच नगरपरिषद कार्यालय सुरू असताना कार्यालयीन वेळेत ज्या एकल महिलांना स्वतःहून आपली माहिती नगरपरिषदेकडे नोंदवायची आहे, त्यांनी श्रीमती प्रतिमा पासलकर, लेखापरीक्षक यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत एकल महिलांसाठी विविध योजना राबविणे, पात्र महिलांना योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच एकल महिलांसाठी समावेशक धोरण निश्चित करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सर्वेक्षणासाठी माहिती देण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२६ असून, संबंधित महिलांनी निर्धारित मुदतीत आपली माहिती नोंदवून सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

















