” शैक्षणिक व रक्तदान क्षेत्रात ” उत्तुंग कामगिरी केल्याने माथेरान येथे सन्मानित !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – गेली ४ दशके ” शैक्षणिक व रक्तदान ” क्षेत्रात अव्वल व ” न भूतो – न भविष्यती ” असे अतुलनीय कार्य करून देशाची भावी पिढी घडविणारे तर अनेकांना रक्तदानातून ” जीवनदान ” मिळवून देणारे रायगड भूषण तर कर्जत तालुक्याची शान महा रक्तवीर ” राजाभाऊ कोठारी ” सरांची सन्मानाची गौरवशाली मालिका राज्यात – जिल्ह्यात – तालुक्यात सुरू असून त्यांना नुकतेच लोकशाहीचा चौथा स्तंभ ” माथेरान प्रेस क्लब ” तर्फे सन्मानित करून त्यांच्या मुकुटात ” मानाचा तुरा ” रोवण्यात आला.
सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी ” माथेरान प्रेस क्लब ” च्या वतीने कुमार प्लाझा – माथेरान , या पंच तारांकित हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ” शैक्षणिक व रक्तदान क्षेत्रात ” उत्तुंग कामगिरी करीत असल्याबद्दल राजाभाऊ कोठारी सर यांना पत्रकार क्षेत्रातील ” महामेरू – द्रोणाचार्य स्वर्गीय संतोष पवार स्मृती पुरस्काराने ” गौरविण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारांची संघटना माथेरान प्रेस क्लब आयोजित ” स्व. संतोष पवार स्मृती पुरस्कार – २०२६ ” , या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मान. प्रशांत गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर माथेरान नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, सरिता मुसळे , प्रसाद सावंत , माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव , राजाभाऊ कोठारी, नितीन कांदळगावकर, माथेरान नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक या सोहळ्यास उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या पुतळ्यास पुष्पहार व ” स्वर्गीय संतोष धोंडु पवार ” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.याप्रसंगी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विविध समाजाचे अध्यक्ष, विविध संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी , त्याचप्रमाणे मल्हार पवार ,गिरीश पवार , जयवंत म्हसे, डॉ.प्रशांत सदावर्ते, आमिर मणियार व माथेरानचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ०८ नवरत्नांना ” स्व. संतोष पवार स्मृती पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी माथेरान नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौधरी , चंद्रकांत जाधव यांना अपंगांसाठी उत्तम काम करीत असल्याबद्दल , राजाभाऊ कोठारी सर यांना शैक्षणिक व रक्तदान क्षेत्रात अत्यंत मोठे व भरीव काम करीत असल्याबद्दल , महिलांसाठी उत्तम काम करीत असल्याबद्दल महिला दक्षता समिती , माथेरान पोलिस ठाणे यांच्या प्रमुख श्रीमती.सुहासिनी शिंदे , सौ. स्वाती कुमार व सौ.स्नेहा चव्हाण यांना , माथेरान मधील पहिल्या महिला पत्रकार सौ.श्वेता शिंदे- पार्टे या सर्वांना शाल – पुष्पगुच्छ – स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गणेशोत्सवा निमित्त घरगुती व सार्वजनिक गणपती आरास सजावट, रील स्टार बाप्पा माझा , गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहिर करुन या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक तथा पत्रकार दिनेश सुतार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माथेरान प्रेस क्लब चे अध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश पवार , मल्हार पवार, चंद्रकांत सुतार , दिनेश सुतार , अजय कदम, तुषार जांभळे, शकील वारूणकर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार चंद्रकांत सुतार यांनी व्यक्त केले.

















