मोठ्या रकमेची बिले देऊन वीज कापून पैसे भरण्यास भाग पाडत असल्याचा दावा; फडणवीस, अमित शाह यांना सोशल मीडिया पोस्टमधून टॅग..
लोणावळा : लोणावळ्यातील आपल्या फार्महाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांनी महावितरणच्या कारवाईवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. मोठ्या रकमेची वीजबिले देऊन वीजपुरवठा खंडित करत पैसे भरण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, थकीत वीजबिलाची रक्कम भरल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
तनिषा मुखर्जी यांनी २९ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लोणावळ्यातील वीज विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. ‘महावितरण माफियासारखे वागत आहे. ते मोठ्या रकमेची बिले देत आहेत आणि वीज कापून पैसे भरण्यासाठी दबाव टाकत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच देय तारखेपूर्वीच वीजपुरवठा खंडित केल्याचा दावाही त्यांनी पोस्टमधून केला.
या पोस्टमध्ये तनिषा मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संबंधितांना टॅग केले होते. लोणावळ्यातील वीजपुरवठ्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. ‘येथे कोणतेही नियमन नसून अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे कारवाई करत आहेत,’ असा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला होता.
दरम्यान, सोशल मीडियावर एका युजरने वीजबिलाची रक्कम अंतिम मुदतीपूर्वी का भरली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर तनिषा यांनी आपण अंतिम मुदतीची वाट पाहत नसल्याचे सांगत, देय तारखेपूर्वी वीजपुरवठा खंडित करणे आणि पडताळणी न झालेले बिल भरण्यासाठी आग्रह धरणे चुकीचे असल्याचा दावा केला.
या आरोपांनंतर महावितरणने आपली बाजू स्पष्ट केली. महावितरणच्या माहितीनुसार, लोणावळ्यातील संबंधित फार्महाऊसची तीन फेजची वीजजोडणी तनिषा मुखर्जी यांच्या नावावर आहे. जुलै २०२६चे वीजबिल त्यांनी ५ ऑगस्ट रोजी भरले होते. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची बिले तयार झाली होती.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट महिन्याच्या बिलाची देय तारीख ४ सप्टेंबर होती. थकीत रकमेबाबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना देण्यात आली होती. १९ सप्टेंबर रोजी नोटीसचा कालावधी संपल्यानंतरही बिलाची रक्कम जमा झाली नव्हती. त्यानंतर स्थानिक महावितरण कर्मचाऱ्यांनी फार्महाऊसच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून बिल भरण्याबाबत सूचना केली होती.
थकीत रक्कम न भरल्याने २६ सप्टेंबर रोजी संबंधित वीजजोडणीचा पुरवठा खंडित करण्यात आला. ही कारवाई थकीत वीजबिलाबाबतच्या निर्धारित प्रक्रियेनुसार करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणने वीजमीटरबाबतही माहिती दिली. संबंधित मीटर फार्महाऊसच्या प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० फूट अंतरावर आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असल्याने मीटर रीडिंगसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना फार्महाऊसच्या व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी तनिषा मुखर्जी यांनी सुमारे ३ हजार रुपयांची थकीत रक्कम ऑनलाइन भरली. त्यानंतर महावितरणने त्यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पुन्हा सुरू केला.
तनिषा मुखर्जी यांनी महावितरणवर मोठ्या रकमेची बिले आणि देय तारखेपूर्वी वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, थकीत बिलाची रक्कम न भरल्याने निर्धारित प्रक्रियेनुसार वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. थकीत रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, अभिनेत्रीचे आरोप आणि महावितरणचे स्पष्टीकरण यामुळे लोणावळ्यातील हे प्रकरण चर्चेत आले आहे.

















