फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या दुचाकींवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा दणका..

पवनानगर परिसरात २७ वाहनचालकांवर कारवाई; ४५ हजारांचा दंड वसूल..

लोणावळा : दुचाकींना आफ्टरमार्केट सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून ग्रामीण भागातील रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या तरुणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पवनानगर परिसरात ८ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबवत पोलिसांनी एकाच दिवसात २७ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

दुचाकींमधून मोठ्या आवाजात धूर आणि कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधातही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.

या कारवाईदरम्यान नियमबाह्य सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न तसेच अन्य अनधिकृत उपकरणे बसविलेल्या दुचाकी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही वाहनांमधील नियमबाह्य सायलेन्सर व हॉर्न काढून घेण्यात आले. कारवाई करण्यात आलेली वाहने पोलीस ठाण्यात आणून नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भूषण माने यांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांना स्पष्ट इशारा दिला आहे. दुचाकींमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात वाहन चालविणे तात्काळ थांबवावे. यापुढे अशा प्रकारची वाहने आढळल्यास यापेक्षा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही अशा प्रकारे कर्णकर्कश आवाज करणारी वाहने किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या तक्रारी व सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगलाच धक्का बसला आहे. प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवैध धंदे, नियमबाह्य कृत्ये आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने धडक कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत तत्परतेने कायदेशीर कारवाई केली जात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, विश्वास आणि आदरही वाढला आहे.

Views: 76

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick