लोणावळा : नियमभंगाची कारवाई करण्याची भीती दाखवत दुचाकीस्वाराकडून ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) तीन जवानांविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा एक्झिट येथे १ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमसिंग मोतीसिंग रघुवंशी (वय ३३, व्यवसाय शिक्षक, सध्या रा. कल्याण, मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) हे पत्नी रिना यांच्यासह रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेटवरून (क्र. 25 BH 0373 L) प्रवास करत होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते खंडाळा एक्झिट परिसरातून जात असताना तेथे तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना अडवले.
रघुवंशी यांनी चारचाकी वाहनांसाठी असलेल्या मार्गावरून दुचाकी नेल्याचे सांगत जवानांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्यांना सांगितले. यासाठी सहा हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अन्यथा वाहन जप्त करून वाहन चालविण्याचा परवाना रद्द केला जाईल, अशी भीती दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर कारवाई टाळण्यासाठी अमोल गणपत डोके यांच्या नावाने असलेल्या QR कोडवरून ऑनलाइन एक हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. ही रक्कम सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी पाठवण्यात आली. त्यानंतर आपल्याकडून नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर रघुवंशी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून निलेश अशोक साळुंखे, रोहीदास बदाम पाटील आणि राजेश सूर्यकांत केंद्रे या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत. पोलीस अंमलदार चाकणे यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

















