लोणावळा ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई; चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून महिला आरोपीला अटक.
लोणावळा : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत बंद कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्पर तपास करत अटक केली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना कुसगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसगाव येथील एका महिलेच्या घरातील दोन सोन्याचे मंगळसूत्र तसेच रोख रक्कम चोरीस गेल्याचे ६ सप्टेंबर २०२६ रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घरातील परिस्थिती, उपलब्ध माहिती आणि विविध बाबींच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान घरात काम करणाऱ्या महिलेवर पोलिसांना संशय आला. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरीच्या घटनेचा उलगडा झाला.
सदर महिला नोकरानेच घरात कोणी नसल्याची संधी साधून बंद कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्याकडून एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, तिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
अष्ट दिशा 24/7 NEWS
सत्य बातमी, थेट तुमच्यापर्यंत.

















