वाघमारे यांना अतिउत्कृष्ट; कसबेकर, गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक..
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात पोलिस दलात कर्तव्यनिष्ठेने आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर पोलिस हवालदार अमोल कसबेकर आणि सचिन गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे मावळ पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रकाश वाघमारे यांनी पोलिस दलात तब्बल ३५ वर्षे कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेची यापूर्वीही दखल घेण्यात आली आहे. बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना आगीच्या भीषण दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीन नागरिकांचे प्राण वाचविण्याचे धाडस त्यांनी केले होते. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यांनी शंभरहून अधिक गावठी पिस्तुले जप्त केली असून आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांविरोधातील कारवायांमध्येही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
अमोल कसबेकर यांनी जिल्हा वाहतूक शाखेसह इंदापूर, लोणावळा शहर आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्यात सेवा बजावली आहे. गंभीर आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून अनेक प्रकरणांची उकल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या तपास कौशल्याची यापूर्वीही दखल घेण्यात आली असून, २०२३ मध्ये त्यांना पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक मिळाले आहे.
सचिन गायकवाड यांनीही अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. तांत्रिक तपास आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासातील त्यांच्या विशेष कौशल्यामुळे पोलिस दलात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांना यापूर्वी २०२० मध्ये पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले आहे.
प्रकाश वाघमारे सध्या लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अमोल कसबेकर हे वडगाव मावळ पोलिस ठाण्यात सेवा बजावत असून सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. सचिन गायकवाड हेही वडगाव मावळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तिघांच्या या सन्मानाबद्दल पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

















