तांबे, अॅल्युमिनियम अन् ट्रान्सफॉर्मर ऑइलसाठी डीपीवर डल्ला? लाखोंच्या विद्युत मालमत्तेचे नुकसान; सलग घटनांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
लोणावळा : लोणावळ्याजवळील आपटी येथे डीपी चोरीची घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डोंगरगाववाडी येथेही विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील डीपींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्युत डीपी चोरणे हे साधे काम नाही. त्यासाठी लागणारी तयारी आणि तांत्रिक माहिती पाहता, या चोरीच्या घटनांमागील व्यक्ती साध्यासुध्या नसल्याचे दिसून येते. सलग दोन दिवस डीपी चोरीच्या घटना समोर आल्याने चोरट्यांना कायद्याची भीती राहिली नाही का, असा प्रश्न आता लोणावळेकरांना पडला आहे.
डीपीमध्ये असलेले तांबे, अॅल्युमिनियमच्या वाइंडिंग्ज, ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर धातूंच्या भागांना भंगार बाजारात किंमत मिळते. या साहित्याच्या आर्थिक मूल्यासाठी ट्रान्सफॉर्मरमधील भाग चोरले जात असल्याचा संशय आहे. एका डीपीची किंमत साधारण तीन ते चार लाख रुपये असू शकते. अशा चोरीमुळे विद्युत उपकरणांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यास त्या परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास भोगावा लागतो.
आपटी आणि डोंगरगाववाडी ही दोन्ही ठिकाणे ग्रामीण भागात असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात वर्दळ कमी असते. अशा सामसूम वातावरणाचा फायदा घेऊन चोरट्यांना चोरी करणे आणि साहित्य बाहेर नेणे सोपे जात असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. चोरी नेमकी कशी झाली, कोणत्या वाहनाचा वापर झाला आणि किती साहित्य चोरीला गेले, याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.
विशेष म्हणजे, पुणे ग्रामीण पोलिसांनी १७ मार्च २०२६ रोजी ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी पाच जणांना अटक केली होती. या कारवाईत जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर आणि दौंड तालुक्यांतील २३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. या प्रकरणात १३७ किलो तांब्याच्या पट्ट्या व तारा तसेच चोरीसाठी वापरलेली वाहने असा एकूण ८ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईतून ट्रान्सफॉर्मर चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस करण्यात आले होते.
आता आपटी आणि डोंगरगाववाडी येथे सलग दोन दिवस डीपी चोरीच्या घटना घडल्याने या दोन्ही प्रकरणांचा गांभीर्याने तपास होणे गरजेचे आहे. या घटनांमागे एकच टोळी आहे का, चोरीचे साहित्य कुठे विकले जाते आणि अशा चोऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारे कोण आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्यास डीपी चोरीच्या घटनांमागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यास मदत होईल.
लाखोंच्या विद्युत मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणे आणि त्यांची टोळी जेरबंद करणे, हे लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान आहे. आपटीनंतर दुसऱ्याच दिवशी डोंगरगाववाडीत डीपी चोरी झाल्याने या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लोणावळा परिसरातील डीपी चोरीचे सत्र थांबवण्यासाठी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
— अष्ट दिशा 24/7 न्यूज

















