अमेरिका, कॅनडातील नागरिकांना बनावट कंपनी प्रतिनिधी बनून गंडा घातल्याचा आरोप; ३६ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त..
लोणावळा : परदेशातील नागरिकांना नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी व्हिलामध्ये बेकायदा कॉल सेंटर चालवले जात असल्याचा प्रकार लोणावळ्यात समोर आला आहे. नांगरगाव हद्दीतील ओमेगा सोसायटी परिसरातील ‘देव व्हिला’ येथे सुरू असलेल्या या कथित प्रकाराप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ३६ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी पहाटेपासून सायंकाळपर्यंत या व्हिलामध्ये संशयित आरोपींच्या माध्यमातून कॉल सेंटर चालवले जात असल्याचा प्रकार समोर आला. आरोपींनी एकत्र येऊन भाडेतत्त्वावर व्हिला घेतला होता. तेथून इंटरनेट आणि विविध ॲप्लिकेशन्सच्या मदतीने अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांतील नागरिकांशी संपर्क साधला जात असल्याचा आरोप आहे.
अमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रांचा वापर केला जात होता. विविध योजनांच्या नावाखाली परदेशी नागरिकांशी संवाद साधून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवली जात असल्याचा संशय आहे. नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डचा तपशील मिळवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकारात नागरिकांना पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचे सांगून भीती दाखवली जात होती. संबंधित नागरिकांवर कारवाई होऊ शकते, असा आभास निर्माण करून त्यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप आहे. परदेशातील नागरिकांना अशा प्रकारे धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
या कथित फसवणुकीतून मिळणारी रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय चलनात रूपांतरित केली जात असल्याचाही आरोप आहे. या व्यवहारांमध्ये आरोपी इरफान अब्दुल गफूर शेख आणि मोहम्मद फैज उर्फ नाजिश आरिफ शेख यांच्यासह अन्य व्यक्तींचा सहभाग असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामागील आर्थिक व्यवहार, परदेशी नागरिकांची फसवणूक किती प्रमाणात झाली आणि प्रत्येक संशयिताची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी बाळासाहेब अरुण खडके (वय ३८, पोलीस हवालदार, लोणावळा शहर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमान इम्तियाज शेख (वय २१), मोहम्मद फैज उर्फ नाजिश आरिफ शेख (वय २६), मोहम्मद अफजल शेख हर्शद शेख (वय २६), कुलदीप मनोज बागडी (वय ३७), रिहान सलम घनानी (वय १९), मोहम्मद अलीरजा सय्यद (वय २१), तावीश मेहबूब अली शेख (वय २०), कामरान इसामुद्दीन शेख (वय २०), सदाम चाँद खान (वय ३०), सुजल खुमबहादूर राणा (वय ३५), अब्दुल आहात मोहम्मद रफिक खान (वय २२), झहिय वाहिद खान (वय २१), जाहीद आजम शेख (वय २०), धनराज देवजीत बोस (वय २६), शादाब जावेद सय्यद (वय २६), इरफान अब्दुल गफूर शेख (वय ४१), समीर इरफान शेख (वय ३३), इरशाद इरफान शेख (वय ३२), अमिर सिराज खान (वय ३१) आणि मकसूद शमीम चौधरी (वय २०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे पत्ते प्रामुख्याने मुंबईतील मालाड-मालवणी परिसरातील असून, काही आरोपींचे पत्ते माटुंगा, बदलापूर आणि शिलाँग येथील आहेत.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी), तसेच इंडियन टेलिग्राफ कायद्यातील कलम २० व २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत. जप्त केलेल्या साहित्याची तपासणी आणि संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी यांतून या कथित कॉल सेंटरच्या कामकाजाबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
अष्ट दिशा 24/7 News

















