लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; पत्नीच्या खुनातील १८ वर्षांपासून फरार आरोपी परभणीतून जेरबंद..

कुसगाववाडीतील २००८ च्या हत्येचा उलगडा; नाव आणि पत्ता बदलून राहत असलेल्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात..

लोणावळा : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देत खून केल्याच्या गुन्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परभणी जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. लिंबाजी नामदेव सोगेवाड (वय ५८, सध्या रा. कुसगाववाडी, ता. मावळ, जि. पुणे; मूळ रा. महातपुर, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. नाव आणि पत्ता बदलून तो महातपुर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २००८ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मावळ तालुक्यातील कुसगाववाडी येथे ही घटना घडली होती. आरोपी लिंबाजी सोगेवाड हा दारू पिऊन घरी आला होता. पत्नी लता लिंबाजी सोगेवाड (वय २५) हिने दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून त्याला राग आला. त्यानंतर आरोपीने स्वयंपाकघरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल पत्नीच्या अंगावर ओतून माचिसच्या काडीने तिला पेटवून दिले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता.

फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त आदेशानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण माने आणि सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी परभणी जिल्ह्यात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलीस हवालदार केतन तळपे आणि पोलीस शिपाई गोकुळ खेडकर यांचे पथक परभणी जिल्ह्यात रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि सखोल तपासानंतर आरोपी महातपुर येथे नाव व पत्ता बदलून राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण माने आणि सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलीस हवालदार जय पवार, ईश्वर काळे व केतन तळपे, पोलीस शिपाई गोकुळ खेडकर, अमोल गवारी, शेख (बकल क्रमांक १६८८, सोनपेठ पोलीस ठाणे, जि. परभणी) तसेच महातपुरचे पोलीस पाटील विजय चाफळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण करीत आहेत.

Views: 171

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick