विनयच्या गोष्टी’ बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा; भटू देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार..

पुणे (दि. २०) : अनिकेत प्रकाशन आणि काव्यमित्र संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिक सुदाम विश्वे यांनी लिहिलेल्या ‘विनयच्या गोष्टी’ या बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याच प्रसंगी आदर्श मुख्याध्यापक भटू देवरे यांना पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड होते. लेखिका व कवयित्री मुक्ता कोरपे, अनिकेत प्रकाशनचे अनिकेत मच्छिंद्र ऐनापुरे आणि ज्येष्ठ कवी डॉ. देविदास बामणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. काव्यमित्र संस्थेचे राजेंद्र सगर व ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक यांच्या संयोजनातून सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी पुस्तकाचे लेखक सुदाम विश्वे म्हणाले, “शिक्षकाची नोकरी करीत असताना विनय हा कथानायक गवसला. या केवळ एका विनयच्या गोष्टी नसून प्रत्येक घरातल्या विनयच्या गोष्टी आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक पालकांना, शिक्षकांना निश्चित उपयोगी पडेल.”

अध्यक्षीय भाषणात डॉ. दिलीप गरुड म्हणाले, “सदर पुस्तकातील विनयच्या कथा प्रत्येकाला आपल्याशा वाटतील. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी व त्यातूनच नकळतपणे मुलांवर संस्कार घडावेत, यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल.”

या प्रसंगी मुख्याध्यापक भटू देवरे व डॉ. शिवदत्ता वावळकर यांचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्यमित्र संस्थेचे राजेंद्र सगर यांनी केले.

यावेळी ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे, सूरज कुलकर्णी तसेच अनेक ज्येष्ठ लेखक, कवयित्री व रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमात परिवर्तनवादी कवितांची मेजवानीही रसिकांना मिळाली.

Views: 28

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick