लोणावळा : मावळ तालुक्यातील बोरज गावच्या हद्दीतील गायरान परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांच्या हाती लागले असून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरज गावच्या हद्दीतील गायरान परिसरात दाट झाडाझुडपांचा फायदा घेत काही इसम अवैध गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती १५ सप्टेंबर रोजी लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी गायरान परिसरात लपवून ठेवलेले सुमारे २ हजार लिटर कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी हे रसायन घटनास्थळीच नष्ट केले. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी व्यवसायाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून, अवैध धंदे करणाऱ्यांना कारवाईचा स्पष्ट इशारा दिला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भूषण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार जय पवार, नितीन कदम, संतोष वाडेकर, अक्षय देवकते, यश देसाई आणि ऋषीकेश अभंग यांच्या पथकाने केली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मावळ तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीसह विविध बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अशा गैरकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

















