मावळ तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा..
मावळ तालुक्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ प्रभावी भूमिका बजावणारे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदनजी बाफना यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेससह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मदन बाफना यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९६७ मध्ये त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मावळ तालुका काँग्रेस तसेच पुणे जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९७७ मध्ये ते पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषदेतील कामातून त्यांचा तालुक्याच्या राजकारणातील जनसंपर्क आणि संघटनात्मक प्रभाव अधिक मजबूत झाला.
१९८५ मध्ये मदन बाफना प्रथमच मावळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले. त्या निवडणुकीत त्यांनी ३७ हजार २८ मते मिळवत विजय मिळवला. आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांची विधानसभेतील सभापती तालिकेवर नियुक्ती झाली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी पुन्हा मावळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले.
मदन बाफना यांची कारकीर्द केवळ आमदारकीपुरती मर्यादित राहिली नाही. १९८९ मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. महसूल आणि नगरविकास या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९० मध्ये पुन्हा आमदार झाल्यानंतर विधी व न्याय तसेच अर्थ विभागाशी संबंधित राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. मावळमधून राज्यमंत्री होणारे ते पहिले आमदार होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यासोबत काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव होता. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ते पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत राहिले. पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात त्यांचा भाजपच्या रूपलेखा ढोरे यांच्याकडून पराभव झाला. त्या निवडणुकीत ढोरे यांनी ७१ हजार ४५२ मते मिळवली, तर मदन बाफना यांना ५० हजार ९०० मते मिळाली.
यानंतरही मदन बाफना मावळच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय राहिले. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा राजकीय अनुभव आणि मावळातील जनसंपर्क कायम चर्चेत राहिला. अलीकडच्या काळातही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत होते. २०२४ मध्ये लोणावळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी भाषण केले होते.
मदन बाफना यांच्या निधनाने मावळ तालुक्याने दीर्घ राजकीय अनुभव असलेले ज्येष्ठ नेतृत्व गमावले आहे. आमदार, राज्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी मावळच्या राजकीय वाटचळीत उमटवलेला ठसा कायम स्मरणात राहील.
अष्ट दिशा २४/७ न्यूज परिवारातर्फे माजी मंत्री मदनजी बाफना साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अष्ट दिशा 24/7 न्यूज
सत्य, वेगवान, विश्वासार्ह बातमी

















