गणेश मंडपाच्या सजावटीदरम्यान विजेचा धक्का; कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू..

वडगाव मावळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडपाच्या सजावटीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगाव मावळ येथे मंगळवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिवराज कडू असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील रहिवासी असून पुण्यातील विधी महाविद्यालयात द्वितीय वर्षात कायद्याचे शिक्षण घेत होता. गणेशोत्सवाच्या तयारीच्या कामात तो सहभागी झाला होता.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता गणेश मंडपाच्या सजावटीचे काम सुरू होते. त्यावेळी विद्युत व्यवस्था सुरू करण्यासाठी बटन सुरू करत असताना शिवराज याचा जिवंत विद्युत प्रवाहाशी संपर्क आला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसून तो गंभीर झाला.

घटनेनंतर उपस्थितांनी त्याला तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असून घटनेचा तपास करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने वडगाव मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

अष्ट दिशा 24/7 NEWS
सत्य बातमी, थेट तुमच्यापर्यंत.

Views: 154

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick