गोल्ड व्हॅली डी सेक्टरमध्ये अवैध वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड; दोन पुरुष, महिलेला ताब्यात, दोन मुलींची सुधारगृहात रवानगी..

लोणावळा : तुंगार्ली परिसरातील गोल्ड व्हॅली डी सेक्टर येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या कथित अवैध वेश्याव्यवसायावर लोणावळा शहर पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन पुरुष, एक महिला आणि दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गोल्ड व्हॅली डी सेक्टरमधील एका बंगल्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला. यावेळी दोन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दोन मुलींना संरक्षणाच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर दोन्ही मुलींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे समजते.

ही कारवाई मावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने केली.

गोल्ड व्हॅलीसारख्या निवासी परिसरातील बंगल्यात अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या व्यवसायाचे धागेदोरे कुठपर्यंत जोडलेले आहेत आणि त्यामागील संपूर्ण यंत्रणा कशी कार्यरत होती, याचा तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

Views: 283

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick