टाकवे बुद्रुकमध्ये संतापाचा उद्रेक; चिमुकलीला न्यायासाठी गाव एकवटले..

मूक मोर्चा, निषेध सभा अन् बाजारपेठ कडकडीत बंद; आरोपी बाळू नामदेव आसवलेवर कठोर कारवाईची मागणी..

वडगाव मावळ : दोन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मावळ तालुका हादरला असून, या अमानुष घटनेच्या निषेधार्थ टाकवे बुद्रुक येथे रविवारी नागरिकांचा संताप उफाळून आला. चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपी बाळू नामदेव आसवले (वय ५१) याला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत मूक मोर्चा काढला, निषेध सभा घेतली आणि बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली.

टाकवे बुद्रुक येथील खंडोबा चौकात झालेल्या निषेध सभेला महिला, युवक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आरोपीला अटक झाल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले असले तरी, केवळ अटकेवर प्रकरण थांबता कामा नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.

घोषणाबाजी नाही, पण संताप स्पष्ट.

निषेध सभेनंतर ग्रामस्थांनी शांततेत मूक मोर्चा काढला. कोणतीही घोषणाबाजी न करता काढण्यात आलेल्या या मोर्चातून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

मोर्चानंतर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून उपलब्ध पुरावे सक्षमपणे संकलित करावेत आणि आरोपीला कायद्यातील कोणतीही पळवाट मिळू नये, यासाठी तपास यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर मदत, संरक्षण आणि मानसिक आधार मिळावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त.

घटनेनंतर गावातील वातावरण संवेदनशील असल्याने पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दरम्यान, आरोपी स्थानिक आणि पीडित कुटुंब परप्रांतीय असल्याची पार्श्वभूमी असतानाही ग्रामस्थांनी कोणताही भेद न करता चिमुकलीच्या न्यायासाठी एकत्र येत कडकडीत बंद आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. या एकजुटीची परिसरात चर्चा सुरू आहे.

Views: 102

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick