एकवीरा मंदिराच्या प्रश्नांवर ग्रामस्थांचा एल्गार; रोपवे रद्द करण्यासाठी रास्ता रोको..

लोणावळा : श्री क्षेत्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध मूलभूत समस्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधतानाच प्रस्तावित फनिक्युलर रोपवे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी वेहेरगाव, दहिवली, कार्ला तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविकांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतली. एकवीरा देवीच्या पायथा मंदिरापासून कार्ला फाट्यापर्यंत भव्य मोर्चा काढल्यानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पावसाची तमा न बाळगता महिला, पुरुष, तरुणांसह मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

मंदिर परिसरातील विकासाला ग्रामस्थांचा विरोध नसून, स्थानिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करून नव्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यास विरोध असल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचे प्रलंबित काम पूर्ण करणे, भाविकांसाठी सुरू असलेल्या पायऱ्या व पायवाटीच्या कामाचा दर्जा तपासून ते काम सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे, नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छ व पुरेशी शौचालये उपलब्ध करून देणे, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि देवस्थान परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करणे, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडल्या.

देवस्थान परिसरात वाढणारी भाविक आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनधिकृत वाहतूक, मद्यपान करून मंदिर परिसरात गोंधळ घालणारे प्रकार तसेच भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावरही तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय वनविभागाच्या ताब्यात असलेली आवश्यक जागा अधिकृत वाहनतळासाठी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या सर्व प्रश्नांसोबतच मंदिर परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या फनिक्युलर रोपवे प्रकल्पाला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला. स्थानिकांच्या मागण्या आणि मंदिर परिसरातील प्रत्यक्ष परिस्थितीचा सर्वंकष विचार न करता प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. रोपवे प्रकल्प रद्द करण्याची मागणी ही आंदोलनातील प्रमुख मागणी ठरली.

रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मंदिर परिसराशी संबंधित विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी संबंधित सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.

मात्र, आंदोलन स्थगित झाले असले तरी ग्रामस्थांचा संघर्ष संपलेला नाही. ३ सप्टेंबरच्या बैठकीत केवळ चर्चा न होता प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय झाला पाहिजे, तसेच फनिक्युलर रोपवे प्रकल्प रद्द करण्याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागण्यांची पूर्तता झाली नाही आणि रोपवे प्रकल्प रद्द करण्यात आला नाही, तर नवरात्रोत्सवाच्या काळात पंचक्रोशीतील गावांमध्ये बेमुदत बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी शासनाला दिला आहे.

एकवीरा देवी मंदिर हे मावळसह राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या आंदोलनाला आता केवळ स्थानिक प्रश्नाचे स्वरूप न राहता मंदिर परिसराच्या विकासाची दिशा, स्थानिकांचा सहभाग आणि भाविकांच्या सुविधांचा प्रश्न जोडला गेला आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्व विभागांच्या बैठकीत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे वेहेरगाव, दहिवली, कार्ला आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.

Views: 112

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick