भाविकांसाठी पार्किंग, स्वच्छतागृह, निवारा शेड, पिण्याचे पाणी आणि सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचे निर्देश.

मावळ, १७ ऑगस्ट : श्रावणी सोमवारनिमित्त मावळ तालुक्यातील प्रसिद्ध श्री कोंडेश्वर देवस्थानला आमदार सुनील आण्णा शेळके यांनी भेट देत कोंडेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
श्रावण महिना आणि पावसाळ्यात कोंडेश्वर देवस्थान परिसरात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी मंदिर परिसरातील उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी केली.
यावेळी भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षेसाठी सीमाभिंत उभारण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
वनविभागाच्या परवानग्या तातडीने घेण्याच्या सूचना.
प्रस्तावित विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या वनविभागाच्या परवानग्या तातडीने मिळवून कामांना सुरुवात करावी, असे निर्देश आमदार शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोंडेश्वर परिसराचा सुरक्षित आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
धार्मिक पर्यटनासोबत स्थानिक रोजगारालाही चालना.
कोंडेश्वर परिसराला धार्मिक महत्त्वाबरोबरच पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण आणि धबधब्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. पर्यटन वाढल्याने स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे आमदार शेळके यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार शेळके यांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. तसेच स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भाविकांच्या सुरक्षेचा आढावाही घेतला. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने आमदार शेळके यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

















