लोहगड हत्या प्रकरणाला नवे वळण; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरी अटक..

चेतन चौधरीचा वर्गमित्र रितेश हिंगे पोलिसांच्या ताब्यात; हत्येच्या कटाची माहिती असल्याचा संशय, १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी..

लोणावळा : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांची दरीत ढकलून हत्या केल्याच्या बहुचर्चित प्रकरणाला आता पुन्हा एकदा मोठे वळण मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका तरुणाला अटक केली असून, रितेश हिंगे असे त्याचे नाव आहे. या अटकेमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.

रितेश हिंगे हा मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या हत्येच्या कथित कटाची रितेशला माहिती होती. मात्र, त्याने ही माहिती पोलिसांना दिली नसल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रितेश मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतन चौधरीच्या संपर्कात होता. १८ जून रोजी केतनला लोहगडावर नेण्यापूर्वी रितेशलाही त्यांच्यासोबत येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने लोहगडावर जाण्यास नकार दिला. त्यानंतर केतनच्या हत्येनंतर चेतनने रितेशची भेट घेतल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सिया गोयलचाही रितेशशी संपर्क असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

डिलीट केलेल्या WhatsApp चॅटमुळे तपासाला नवी दिशा.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना डिलीट करण्यात आलेल्या WhatsApp चॅट्स महत्त्वाचा धागा ठरल्याचे समोर आले आहे. सिया, चेतन आणि रितेश यांच्यातील संपर्क तसेच हत्येच्या कथित कटाबाबतची माहिती तपास यंत्रणेकडून तपासली जात आहे. डिलीट केलेले संभाषण पोलिसांनी तांत्रिक मदतीने पुन्हा मिळवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रितेशची भूमिका नेमकी काय होती, याचा तपास आता अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे चित्र होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. आता रितेश हिंगेच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला आणखी एक महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू असून, हत्येच्या कटाची त्याला नेमकी किती माहिती होती, त्याचा कटात प्रत्यक्ष सहभाग होता का आणि आरोपींशी त्याचा संपर्क कशा स्वरूपाचा होता, याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

रितेशच्या चौकशीतून केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे समोर येण्याची शक्यता असून, या प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होतात, याकडे मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Views: 319

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick