वाकसाईतील धर्मशाळेच्या बांधकाम साईटवर चोरी; उत्तर प्रदेशासह मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील पाच आरोपी ताब्यात, चोरीसाठी वापरलेली वाहनेही जप्त.
लोणावळा : मावळ तालुक्यातील वाकसाई येथे धर्मशाळेच्या बांधकाम साईटवरून सुमारे १६ लाख ४० हजार रुपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेले १५.७१५ टन लोखंडी साहित्य पूर्णपणे हस्तगत करण्यात आले असून, चोरीसाठी वापरण्यात आलेली आयशर टेम्पो, पिकअप आणि इनोव्हा कार अशी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकसाई येथे गट क्रमांक १९० ए आणि १९०/बी मध्ये पाटण जैन मंडळाच्या धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम साईटच्या मोकळ्या जागेत ठेवलेले लोखंडी मुंडे, सळई आणि पाईप असा एकूण १६ लाख ४० हजार रुपये किमतीचा माल १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान चोरीला गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण माने यांनी तपासासाठी पथक तयार केले. गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
या तपासात लाखन मोहन सिंह (रा. उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुस्ताक अब्दुल मुरुफ खान (रा. साकीनाका, मुंबई), जमालुउद्दीन करम हुसेन मिनार (रा. कल्याण, ठाणे), निसार मुर्तजा हुसेन (रा. पनवेल, मुंबई) आणि मोहम्मद सफिक मोहम्मद हनिफ खान (रा. भिवंडी, ठाणे) यांचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्य संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाईत चोरीस गेलेले १५.७१५ टन लोखंडी बांधकाम साहित्य, ज्यामध्ये लोखंडी मुंडे, सळई आणि पाईप यांचा समावेश आहे, हस्तगत करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली आयशर टेम्पो, पिकअप आणि इनोव्हा कार जप्त करण्यात आली. त्यामुळे बांधकाम साईटवरील लोखंड चोरीच्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी भूषण माने आणि तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलीस हवालदार सतीश कुदळे, राहुल खैरे, शुभम सांडभोर, संतोष वाडेकर, गोकुळ खेडकर, अमोल गवारी आणि होमगार्ड अमित भदोरिया यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करीत आहेत.

















