मावळ परिसर हादरला! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार..

५१ वर्षीय नराधम बाळासाहेब असवले याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल…

​विशेष बातमी प्रतिनिधी (मावळ)

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या २ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत ५१ वर्षीय संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १) सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास ही चिमुरडी जवळच असलेल्या दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी बाळासाहेब नामदेव असवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवत आरोपी बाळासाहेब असवले याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (POCSO – पोक्सो) कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​आरोपीला गुरुवारी (दि. ३) मावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवार, ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.

​मावळ परिसरात लहान मुलांशी संबंधित अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कामानिमित्त घराबाहेर पडताना किंवा मुलांना इतरांच्या भरवशावर सोडताना पालकांनी अधिक सावधगिरी व सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Views: 291

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick