जानेवारीपासून सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या अनेक घटना; अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी चिंता वाढली…
मावळ | प्रतिनिधी
मावळ : तालुक्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जानेवारी २०२६ पासून सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत तालुक्यातील विविध भागांत लैंगिक अत्याचार, विनयभंग, छुपे चित्रीकरण तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना माध्यमांतून समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील काही प्रकरणांमध्ये पीडित मुलींचे वय अत्यंत कमी असल्याने या घटनांनी मावळ हादरले आहे.
२५ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे येथे आठ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गॅरेज कामगाराला अटक करण्यात आली. त्यानंतर १६ मार्च रोजी कामशेत येथे दुकानात महिलेचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात दुकानमालकाला अटक करण्यात आली.
लोणावळा ग्रामीण, जवन येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेप्रकरणी नंतर तक्रार दाखल करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालेली शून्य एफआयआर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर मे २०२६ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे येथे मे महिन्यातील घटनेबाबत ३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. १२ वर्षीय मुलीचे फोटो वापरून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली.
जुलैमध्ये वडगाव मावळ येथे भोंदू बाबा स्वप्नील लांडे याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून आरोपी फरार असल्याचे वृत्त आहे.
ऑगस्ट महिन्यात पवनानगर परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात दिनेश काळे याला अटक करण्यात आली.
त्यानंतर केशवनगर, वडगाव मावळ येथे पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात प्रशिक्षण देणाऱ्या राजू माडगी याला अटक करण्यात आली असून ॲट्रॉसिटी कायद्यानुसारही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच टाकवे बुद्रुक येथे अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात ५१ वर्षीय बाळू आसवले याला अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध BNS कलम ६५(२) तसेच POCSO कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न.
जानेवारी ते ४ सप्टेंबर या कालावधीत माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या घटनांचा आढावा घेतल्यास मावळ तालुक्यात लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमध्ये लहान वयाच्या मुलींचा समावेश असणे ही विशेष चिंतेची बाब आहे.
एकापाठोपाठ समोर येणाऱ्या या घटनांमुळे आरोपींवर कारवाई करण्याबरोबरच महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. शाळा, प्रशिक्षण केंद्रे, कामाची ठिकाणे तसेच सार्वजनिक आणि पर्यटनस्थळांवर सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आव्हान प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे.
मावळातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता केवळ एखाद्या घटनेपुरता मर्यादित राहिलेला नसून, या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

















