कामशेतमध्ये गांजा विक्री करणारा तरुण जेरबंद; एक लाखाचा मुद्देमाल जप्त..

988 ग्रॅम गांजासह दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम व वजनकाटा पोलिसांच्या ताब्यात.

कामशेत : कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला जेरबंद केले. या कारवाईत 988 ग्रॅम गांजासह दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागेश रुपेश लोंढे (वय 20, रा. भैरवनाथनगर मंदिराजवळ, कामशेत) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. संशयित नागेश लोंढे याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 988 ग्रॅम गांजा जप्त केला.

यासोबतच दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या असा एकूण सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा त्याने कोठून आणला होता, तसेच या अमली पदार्थांच्या विक्रीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, पोलीस हवालदार संतोष शेळके, सागर नामदास, गणेश होळकर, संतोष भापकर, गणेश धनवे, सिध्देश्वर पाटील आणि तुषार भोईटे यांच्या पथकाने केली.

कामशेत परिसरात अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Views: 124

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick