लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध कार्ला एकवीरा देवी मंदिर परिसरात ८ सप्टेंबर रोजी अचानक भला मोठा अजगर आढळून आल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मंदिराच्या पार्किंग परिसरातील एका कोपऱ्यात तब्बल ९.६ फूट लांबीचा अजगर आढळून आला.
अजगर दिसताच परिसरातील नागरिक आणि भाविकांची धांदल उडाली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिकांनी वेळ न दवडता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला. माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र संभाजी भानुसघरे आणि संजय येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघांनीही अत्यंत कौशल्याने अजगराला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. त्यामुळे परिसरातील भाविक आणि पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंदिर परिसरासारख्या वर्दळीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या अजगराचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलासह काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेमुळे अजगराला कोणतीही इजा न होता त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अष्ट दिशा 24/7 NEWS
सत्य बातमी, थेट तुमच्यापर्यंत

















