महाबळेश्वरच्या प्रवासाला निघाले, पण काळाने गाठले; शिरवळच्या भीषण अपघातात मावळातील चार तरुणांचा मृत्यू.

मावळ : महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांच्या प्रवासावर शिरवळ येथे काळाने घाला घातला. पुणे-सातारा महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे तळेगाव दाभाडे, कामशेत आणि टाकवे परिसरावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) यांचा समावेश आहे. या सर्व तरुणांचा मावळ तालुक्याशी संबंध असल्याने या घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सहा मित्र महाबळेश्वरला जाण्यासाठी कारने पुण्याच्या दिशेने निघाले होते. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ येथील हॉटेल शिवालय परिसरात पहाटे सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा नेक्सॉन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने प्रथम महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. धडक एवढी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

या दुर्घटनेत वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत या चौघांचा मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी (वय २०, रा. कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (वय २०, रा. बहुर, कामशेत) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास सुरू आहे.

तरुण वयातील चार मित्रांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कामशेत, टाकवे आणि तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांकडून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका आनंदाच्या प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणांवर काळाने घातलेल्या या घावाने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे.

Share this News on:

Related News

error: Content is protected !!